पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांचे आंदोलन

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना या बाबत निवेदन देऊन मागण्या केल्या आहेत. 

या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना, लंपी स्किन डिसीज व रूपये ५ दूध अनुदान इ. काळात अविरत सेवा दिल्यानंतरही प्रशासकीय अटींमुळे अधिकारी त्रस्त आहेत. तांत्रिक अधिकाऱ्यांकडून अतांत्रिक कामे, अपुरे मनुष्यबळ, वाढता कामाचा ताण, सक्तीची ऑनलाइन उपस्थिती आणि अपुऱ्या सुविधांमुळे निर्माण झालेला ताण इ. अडचणींमुळे महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटनेचे अध्यक्ष डॉ. अनिल गडाख, सरचिटणीस डॉ. किरण देवकाते व पदाधिकारी यांच्या मार्गर्शनाखाली राज्यातील सदस्यांनी आंदोलन पुकारले आहे. सद्या राज्यातील पशुवैद्यकीय अधिकारी निषेधार्थ काळ्या फित लावून कामकाज करत आहेत. 

यानंतर आज ६ मार्च रोजी पासून अहवाल देणे बंद करून असहकार आंदोलन सुरू ठेवणार आहे. परंतु यामध्ये कोणत्याही पशुपालकांना वेठीस धरले जाणार नाही, म्हणजेच सर्व जनावरांना औषधोपचार सुरू राहणार आहे. मात्र शासनाने याची वेळीच दखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र करून सामूहिक राजीनामे व साखळी उपोषण सुरू करणार असल्याचे स्पष्ट कळविले आहे.

त्याबाबत ५ मार्च रोजी विभागीय आयुक्त पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, प्रादेशिक सहआयुक्त व जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुगधव्यवसाय, छ. संभाजीनगर यांना डॉ. विनोद चव्हाण जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटना जिल्हा छ. संभाजीनगर, सचिव डॉ. संदीप राठोड, कार्यकारी अध्यक्ष डॉ. महेश पवार, कोषाध्यक्ष डॉ. भारत दिगुळे, उपाध्यक्ष डॉ. दत्ता गांधले, डॉ. खडसे अभिषेक डॉ. नितीन चव्हाण, डॉ. महेश तळेकर सहा. आयुक्त डॉ. रमण इंगळे, डॉ. असरार अहमद, दुर्गा मंच डॉ. ज्योत्स्ना भगत, स्मिता बायस, डॉ. रोहिणी साळवे, स्मिता इंगळे, डॉ. राजेंद्र अश्विनी व संघटनेच्या इतर सर्व पदाधिकऱ्यांसह सदस्यांनी मागण्या मान्य करण्याबाबत राज्य कार्यकारणीने निवेदन दिले आहे.